कृतज्ञ मी, कृतार्थ मी!!!
डिसेंबर २०२१ मध्ये कार्यकारिणी समिती मध्ये कार्यरत असलेले मल्हार आणि हिमांगी कुलकर्णी, कौस्तुभ देशपांडे, दीप्ती ठाकूर आणि मंजिरी टिळेकर ह्यांनी वैयक्तिक कारणास्तव समिती मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०२२ पासून नवीन कार्यकारिणी समिती मध्ये नव्याने निनाद आणि मीनल बगवाडकर, धवल आणि पूजा दातार, देवेन पहिनकर आणि जुईली देसाई रुजू झाले, तर रोहित हळबे, मीरा आणि निरंजन गाडगीळ हे आता प्रमाणे सक्रिय आहेत. सलग दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंध असल्याने ह्या वर्षी देखील मंडळाने ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. संक्रांतीचा कार्यक्रम देखील कोरोनामुळे आणि नवीन कार्यकारिणी समितीच्या बांधणी मुळे रद्द करावा लागला. यंदाच्या वर्षी नेहमीच्या प्रथेला थोडी बगल देत मंडळाने प्रथमच मराठी राज्यभाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला.
२७ फेब्रुवारीला रविवार असल्याने हि संधी साधत मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन सुरु केले. काहीच दिवसांपूर्वी यतीन ठाकूर ह्यांनी "कृतज्ञ मी, कृतार्थ मी" ह्या वीर सावरकरांवर आधारित नाटकाबद्दल मंडळाशी संपर्क साधला होता. वीर सावरकर ह्यांनी स्वातंत्र्य लढा मध्ये दिलेले योगदान सर्वश्रुत होतेच पण त्यांचे मराठी साहित्यात दिलेले योगदान पण फार मोलाचे आहे. दिनांक, दूरदर्शन सारखे नेहमीच्या वापरातले शब्द त्यांनी आपल्या मराठी भाषेत आणले आणि ह्याच गोष्टीचे औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करायचे ठरले. तेव्हा योगायोगाने पुण्यात असलेल्या देवेन पहिनकर ह्यांनी त्वरित यतीन ठाकूर ह्यांच्याशी संपर्क साधत नाटकाचा आढावा घेतला आणि समितीने त्वरित ह्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब केला. दिनांक २७ तारखेला दुपारी ३.३० वाजता नाटकाचे ऑनलाईन प्रसारण केले गेले. नवीन कार्यकारिणी समितीची ओळख करून नाटकास सुरवात झाली. सुमारे दोन तास असलेल्या नाटकात वीर सावरकरांचे राजकीय आणि अराजकीय आयुष्याचे विविध पैलू अभिनेते आणि दिग्दर्शक यतीन ठाकूर ह्यांनी उत्तम पद्धतीने सादर केले. अभिनेत्री दीप्ती भागवत ह्यांनी माई सावरकर तर यतीन ठाकूर ह्यांनी वीर सावरकरांची भूमिका अगदी उत्तम वठवल्या. रविवार आणि त्यात फिरायला जाण्यास साजेसे सुंदर हवामान असून देखील आपल्या प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत भरघोस प्रतिसाद दिला. नाटका नंतर लेखक आणि कलाकारांसोबत चर्चासत्र आयोजित केले गेले होते जेणेकरुन प्रेक्षक आणि कलाकार ह्यांना संवाद साधता यावा. देवेन पहिनकर ह्यांनी सुत्रसंचलन करत कलाकारांशी संवाद साधून नाटकाचा प्रवास उलगडला. प्रेक्षकांनी देखील मनमोकळेपणाने प्रश्न विचारून कलाकारांशी संवाद साधला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.
धवल, निनाद, पूजा, मीनल, जुईली ह्यांनी अखंड मेहनत घेऊन कार्यक्रमाच्या जाहिराती, रूपरेषा, ध्वनिमुद्रण, इत्यादी कामांचा भार सांभाळला तर रोहित ह्यांनी वेबसाईटचे काम सांभाळले. तर निरंजन आणि मीरा ह्यांनी सर्वच पातळीवर मार्गदर्शन केले. २०२२ ची सुरवात जोमाने झाली असून आम्ही पुढच्या कार्यक्रमाच्या नियोजनाला सुरवात देखील केली आहे. लवकरच आगामी कार्यक्रमाची घोषणा करण्यात येईल.
घेऊन येत आहोत,आपण सर्वच आतुरतेने वाट बघत असलेला, एका अत्यंत वेगळ्या गायनशैलीचा अध्वर्यू असणाऱ्या, ज्यांच्या गायकीने रसिकांना कित्त्येक वर्ष अक्षरशः मंत्रमुग्ध केलं त्या पंडित वसंतराव देशपांडे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारा, त्याच ताकदीचा, त्याच तोलामोलाचा चित्रपट "मी वसंतराव", ज्याला भारतात आणि जगभरात रसिकांनी भरभरून दाद दिली!
दिवस: 2 जून 2022 (गुरुवार)
सायंकाळी 7:00 वाजता
चित्रपटगृह: AEON Cinema Ichikawa, MYODEN
तिकीट: 2,000 JPY (12 वर्षांखालील मुलांसाठी 1,500 JPY)
https://tokyomarathimandal.com/paymentdetails
अत्यंत मोजक्या प्रेक्षकसंख्येत प्रयोग करीत आहोत, त्यामुळे आपले तिकीट लवकरात लवकर आरक्षित करावे