
जगभर कोरोनाचे सावट असताना देखील तोक्यो मराठी मंडळाने सामाजिक भान राखत आणि नियमांचे पालन करत यंदाच्या वर्षी आपले २५वे वर्ष साजरे केले. २५वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे करायची इच्छा असताना देखील केवळ जपान, भारत नव्हे तर साऱ्या जगभर कोरोनाचे सावट पसरले. त्यामुळे एकंदरीतच सार्वजनिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध लादले गेले. यंदाच्या वर्षी गुढीपाडवा साजरा करता न आल्याने आधीच मनाला रुखरुख लागली असताना गणेशोत्सव तरी साजरा करू शकू का ह्याबाबत शंका होती. विमानसेवा ठप्प झाल्याने भारतातून कलाकार पाहुणे बोलवणे कठीण होते आणि आले असते तरी सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेल्या निर्बंधांमुळे कार्यक्रमाला प्रेक्षक जास्त संख्येने उपस्थित राहू शकले नसते त्यामुळे एकंदरीतच मंडळापुढे कुठला कार्यक्रम आयोजित करावा हा प्रश्न उभा होता. आणि अशातच मंडळाला "मोगरा" नामक एका नवीन संकल्पनेमध्ये एक आशेचा किरण दिसला. सर्व नियमांचे पालन करून, आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आपण कार्यक्रम आयोजित करून आपले २५वे वर्ष थोडे वेगळे पण परिस्थितीला अनुसरून साजरे करता आले.
तेजस रानडे लिखित आणि हृषीकेश जोशी दिगदर्शित "मोगरा" नेटक म्हणजेच नेट वरचे नाटक समस्त जपानवासी मराठी प्रेक्षकांसाठी हजर झाले. भारतात सुद्धा लॉकडाऊन मुळे कलासृष्टी एकंदरीतच थंडावलेली असताना हृषीकेश जोशी ह्यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन नाटक म्हणजेच नेटक संकल्पनेचा उदय झाला. घरबसल्या एकाच तिकिटात सहकुटुंब आस्वाद घेता येणारा "मोगरा" एक वेगळाच अनुभव ठरला. स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, मयुरा रानडे, गौरी देशपांडे आणि वंदना गुप्ते ह्यांची प्रमुख भूमिका असलेले नेटक प्रेक्षांच्या चांगलेच पसंतीस उतरले. नेहमी प्रत्यक्षात नाटक पाहणे आणि थेट पण टीव्ही वर नाटक पाहणे हे जरा पचनी पडेल का हि धाकधूक होती, पण उत्तम कथा, अभिनय आणि संवादाने नटलेले हे नेटक प्रेक्षकांना आवडले. सारेकाही नेट वर अवलंबून असल्याने त्यात भारतात अवकाळी वीज दगा देत असताना देखील असा धाडसी प्रयत्न करणे हे खरेच कौतुकास्पद आहे. सुरवातीला थोडी तांत्रिक अडचण येऊन देखील नेटकच्या तांत्रिक लोकांनी त्वरित अडथळे दूर करत कार्यक्रम सुखरूप पार पाडला. कार्यक्रम संपल्यानंतर नेटकच्या परिवाराशी आणि त्यादिवशीच्या पाहुण्या सुमित्रा भावे ह्यांच्याशी संवाद साधता आल्याने कार्यक्रमाची सांगता देखील छान पार पडली.
सुरवातीपासूनच नेटकचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या हृषीकेश जोशी आणि समीरा गुजर जोशी ह्यांच्या तत्पर प्रतिसादाने कार्यक्रम सहज पार पाडत, तोक्यो मराठी मंडळाने "न्यू नॉर्मल" पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. यंदाच्या वर्षी प्रथमच मंडळाने गणेशोत्सव कार्यक्रम दोन दिवसांत विभागून साजरा केला. २२ ऑगस्ट रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फक्त गणेश पूजन आयोजित केले होते. दरवर्षी प्रमाणे आरती कुलकर्णी ह्यांनी प्रसादाची जबाबदारी उचलली. २९ ऑगस्टला नेटकचे आयोजन केले होते. जपानवासीय मराठी प्रेक्षकांनी घरी नाट्यगृहात नाटक बघावे तसे वातावरण (चहा, वडापाव, वगरे) निर्मिती करत नेटक चा आनंद घेतला. कोरोनाने जगभर हाहाकार माजवला असताना देखील त्यातून पर्याय शोधून कार्यक्रम पार पाडल्याने यंदाचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहणार ठरेल.
[गणेश पूजन]
दिनांक: २२ ऑगस्ट
स्थळ: सेइशींचो कम्युनिटी हॉल
[मोगरा]
दिनांक: २९ ऑगस्ट
स्थळ: स्वगृही (ऑनलाईन)










तोक्यो मराठी मंडळाचा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला कार्यक्रम मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात पार पडला. नुकतेच भारतातून आल्यावर पुन्हा एकदा आपल्या घरच्या वातावरणाचा आनंद घेता यावा या साठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी प्रथमच आलेले प्रेक्षक जास्त होते. तोक्यो मराठी मंडळाच्या कार्यकारिणी समितीने विविध मजेशीर खेळांचे आयोजन केले आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली आणि खेळांचा आनंद देखील लुटला.
सुरवातीला प्रथमच आलेल्या पाहुण्यांची ओळख करून घेण्यात आली. नंतर हिमांगी कुलकर्णी ह्यांनी शब्दांचे खेळ, इमोजी वरून गाणे, सिनेमा ओळखणे, असे विविध खेळ आयोजित करून कार्यक्रमाची रंगतदार सुरवात केली. नंतर रोहित हळबे ह्यांनी नाती-गोती नामक एक कोड्यांचा आणि नंतर नात्यांवरील आधारित म्हणींचा खेळ आयोजित करून स्पर्धकांना भलतेच कोड्यात टाकले. त्यानंतर निरंजन गाडगीळांनी देखील छोट्याशा आवाज बंद व्हिडीओला संवाद देयचा असा गमतीशीर खेळ आयोजित केला होता. चेहऱ्याचे हवं भाव बघून त्याला आपल्या मनाचे आणि तितकेच तर्कशुद्ध संवाद देताना स्पर्धकांची भलतीच दमछाक झाली. आणि शेवटी मंजिरी टिळेकर ह्यांनी मराठी व्याकरणाच्या आधारावरच खेळ आयोजित करून स्पर्धकांना बऱ्याच वर्षांनंतर मराठीत लिहायला प्रेरित केले. आणि शेवटी सरप्राईज म्हणून प्रतिज्ञाचा खेळ आयोजित केला होता. ज्याला शाळेतील पाठयपुस्तकातील प्रतिज्ञा पाठ आहे त्या संघाला भरघोस पॉईंट्स असा सरप्राईज खेळ होता पण कुठल्याच संघाला त्याचा फायदा करून घेता आला नाही.
कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केले होते. सर्व प्रेक्षकांनी गप्पांचा आस्वाद घेत अल्पोपहाराचा देखील आनंद घेतला आणि नंतर सर्वानी कार्यालयाची आवराआवरी आणि साफसफाई करण्यात देखील हातभार लावून मंडळाचे काम हलके केल्या बद्दल मंडळ सर्व प्रेक्षकांचे आभारी आहे,
दिनांक : २५ जानेवारी २०२०
ठिकाण: किता कासाई कम्युनिटी हॉल