|| संक्रांत २०१८ ||
तोक्यो मराठी मंडळाचा २०१८ चा संक्रात कार्यक्रम रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.
यंदा नवीन सभासदांची उपस्थिती सर्वात जास्त होती.
प्रथेप्रमाणे हळदीकुंकू आणि वाण लुटून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात अमोल भिडे यांच्या जादूच्या प्रयोगाने झाली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच या "संक्रात स्पेशल" जादूच्या प्रयोगांना मनापासून दाद दिली. यानंतर रोहित हळबे, राजश्री कडेल आणि निरंजन गाडगीळ यांनी सुंदर कवितांचे वाचन केले.

पोटपूजेनंतर कार्यक्रम रंगला तो "वर्ष नवे धमाल नवी"!
मराठी, हिंदी गाणी आणि दैनंदिन मालिकांच्या शिर्षकगीतांच्या कार्यक्रमात सर्वांनी धमाल केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री दाते आणि मंजिरी टिळेकर यांनी केले.

कार्यक्रमात कार्यकारिणीच्या वतीने निरंजन गाडगीळ यांनी कार्यकारिणीचे मनोगत व्यक्त केले. ते खालील शब्दात -
१) आत्ता कार्यकारिणी समिती मधे निरंजन गाडगीळ, मीरा गाडगीळ आणि मंजिरी टिळेकर यांचा सहभाग आहे. मागच्या वर्षी पर्यंत प्रसाद-रुपश्री साठे आणि राहुल-अश्विनी बापट यांचा देखील सक्रिय सहभाग होता. इतर काही व्यवधाने सांभाळायची असल्यामुळे अपरिहार्यपणे त्यांना यापुढे कार्यकारिणीमधे काम करणे शक्य होणार नाही. तस्मात या वर्षीपासून मंडळाच्या कार्यकारिणी समिती मधे अजून सभासदांचा सहभाग अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या आखणीपासून शेवटच्या हिशोबापर्यंत तसेच नवनवीन कल्पना राबवून सर्वांनी मिळून एकत्र येऊन काम करण्याची मजा आपण सर्वांनी अनुभवावी ही विनंती! प्रसाद-रुपश्री साठे आणि राहुल-अश्विनी बापट यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाबद्दल त्यांचे अनेक आभार!
२) तोक्यो मराठी मंडळ हे कायम "ना नफा ना तोटा" या तत्वावर चालत आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या गणपतीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे झाल्यास जपान मधला खर्च लक्षात घेता मंडळाला त्याप्रमाणे तिकिटाची रक्कम आकारावी लागते. सभासदांनी जर कार्यक्रमाला १००% प्रतिसाद दिला तरच आपल्याला त्यातून काही प्रमाणात नफा मिळू शकतो. २०१७ मधे आपल्या प्रायोजकांनी पुढे केलेला मदतीचा हात तसेच आपण आधीच्या कार्यक्रमांमधे जो काही नफा मिळवू शकलो होतो, त्या बळावर "साखर खाल्लेला माणूस" सारखा व्यावसायिक नाट्यप्रयोग आपण जपान मधे घडवून आणू शकलो.
आत्तापर्यंत करत आलेल्या सर्व कार्यक्रमांचे हिशोब कार्यकारिणीचे सदस्य चोख ठेवत आले आहेत. त्याविषयी आपल्याला काही शंका असल्यास कार्यकारिणीला जरुर संपर्क करा.

३) सध्या एदोगावा-कु मधे जेवणखाणासकटच्या कार्यक्रमाला परवानगी मिळणे काही कारणांमुळे थोडे अवघड होत चालले आहे. त्यामुळे इथुन पुढे कदाचित जेवणासकट कार्यक्रम करणे शक्य होणार नाही. अर्थात कार्यकारिणी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि पुढेही करत राहील. यामधे कार्यकारिणीला सर्व सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.