तोक्यो मराठी मंडळाचा मकर संक्रांतीचा कार्यक्रम २३ जानेवारी २०१६ रोजी निशिओजिमा येथे उत्साहात संपन्न झाला.
मंडळाने यंदा २१ व्या वर्षात पदार्पण केले. एकविसाव्या वर्षातला मंडळाचा पहिलाच कार्यक्रम.

कार्यकारी समितीच्या वतीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजिरी टिळेकर यांनी केले. मंडळातर्फे "नाम फाऊंडेशन" ला दिलेल्या देणगीबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच मंडळाच्या २१ व्या वर्षातील कार्यक्रमांबद्दल माहिती दिली.
यानंतर वैविध्य पूर्ण पोशाख व त्याला पूरक असे स्वगत म्हणून दाखवायचा कार्यक्रम - फॅन्सी ड्रेस - सादर झाला. मुरळी (मार्वी धुमाळे), रमाबाई रानडे (शिरीन देशपांडे), कोकिळा (सान्वी देशपांडे), चायनीज मुलगी (सुरभी गाडगीळ), वाहतुक सिग्नल (अश्लेषा नाडकर) अशा अनेक रुपांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या नंतर चिमुरड्या अपूर्वाने एक कविता म्हणून दाखवली. आदित्य फडकेने स्वतः लिहिलेली गोष्ट उपस्थितांना वाचून दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता परांजपे यांनी केले.

यानंतर सर्वांनी अल्पोपहार घेतला. साबुदाण्याची खिचडी, चहा, गुलाबजाम असा बेत होता.
उपस्थित महिलांना हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण देण्यात आले. तसेच सर्वांना तिळगुळही वाटण्यात आला.

कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगला तो मराठी गाण्यांच्या आगळ्या-वेगळ्या अंताक्षरी कार्यक्रमाने.
अंताक्षरीचे आयोजन राहुल बापट, अश्विनी बापट आणि मानसी नाईक यांनी केले. सर्व प्रेक्षकांचे मिळून ४ गट पाडण्यात आले. ह्या चार गटांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. गुणांच्या अगदी थोड्या फरकाने सर्व गटांवर मात करून विजय मिळवला तो "नात्सु" गटाने. या निमित्ताने अनेक जुन्या-नव्या मराठी गाण्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

यंदाची पाककला स्पर्धा होती "अशी ही बनवाबनवी" - अर्थात खाद्यपदार्थांसारखे दिसणारे परंतू खाण्याचे नसलेले पदार्थ! यामधे मोठ्या गटात विजयी ठरल्या स्नेहल रसाळ तर लहान गटाचे बक्षिस मिळवले आर्यन रसाळने.

कार्यक्रमाच्या शेवटी निरंजन गाडगीळ यांनी ७ फेब्रूअरीला मंडळ तोक्यो टोकीज संस्थेच्या सहकार्याने सध्या गाजत असलेला "नटसम्राट" हा चित्रपट तोक्यो मधे प्रदर्शित करीत असलाचे जाहीर केले. तोक्योमधे प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्यामुळे ह्या प्रसंगाचे विशेष महत्व आहे आणि मंडळा सर्वतोपरी सहकार्य करेल असेही ते म्हणाले. तोक्यो टोकीज संस्थेचे श्री अलोक कोगेकर ही ह्या वेळी उपस्थित होते. त्यांनी मंडळाचे आभार मानून जास्तीतजास्त सभासदांनी चित्रपटास उपस्थित रहावे असे आवाहन केले. शेवटी निरंजन गाडगीळ यांनी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले.