तोक्यो मराठी मंडळाचा संक्रांत २०१४ हा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी किताकासाई कम्युनिटी काईकान इथे पार पडला. लहानपण देगा देवा असे ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते. मंडळाच्या सदस्यांनी उत्साहाने ह्या सूत्राला अनुसरुन अनेक करमणुकीचे कार्यक्रम बसवले होते. पहिल्यांदाच एक एकांकिका ही सादर करण्यात आली. कार्य्र्क्माची सुरुवात कार्यकारी समिती सदस्य नरेन देसाई ह्याच्या प्रस्ताविकाने झाली. सर्वांचे नवीन वर्षाबद्दल अभिनंदन करीत त्याने, गेल्या वर्षी प्रमाणेच ह्याही वर्षी अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा समितीचा निर्धार असल्याचे सांगितले.

छायाचित्र: सचीन कुलकर्णी
व्हिडीओ: निरंजन पिंपळे; एडिटींग:शाल्मली गाडगीळ
कार्यक्रमाच्या व्हीडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करावे
कार्यक्रमाच्या पुर्वार्धाची सुरुवात स्वरांजली गटाने सादर केलेल्या गगन सदन तेजोमय ह्या प्रार्थनागीताने झाली. त्या नंतर शुभंकर कुळकर्णीने तबला वादन सादर केले. त्याला पेटीवर त्याचे तबला गुरु श्री.काझुतो साशिहारा ह्यांनी साथ केली. त्या नंतर अनुष्का देशपांडे आणि राधिका देशपांडे ह्या दोघींनी राधा ही बावरी ह्या गाण्यावर मनमोहक नृत्य सादर केले. नृत्यदिग्दर्शन सौ.स्नेहल देशपांडे ह्याचे होते. पुढे, स्वप्नातला गाव ही नृत्यनाटिका मिझुए मधे राहणाऱ्या मुलांनी सादर केली. लहान मुलाची स्वप्न, त्यात होणाऱ्या गमती-जमती मुलांनी गाणे, कविता, नृत्य इत्यादी वापरून मनोरंजक पद्धतीने पेश केले. त्या नंतर ईशा बर्वे आणि अक्षरा पुण्यार्थी ह्या द्वयीने दमदार जलद गतीचे असे राजस्थानी नृत्य सादर केले. विशेष. म्हणजे नृत्य दिग्दर्शनही ह्या दोघींनी स्वतःहाच केले होते. त्या नंतर सौ.शिल्पा रसाळ ह्यांचे नृत्य दिग्दर्शन असेलेला “टिकटिक वाजते डोक्यात” ह्या गाण्यावर नृत्य सादर केले गेले. सुमारे वयवर्ष ५ ते ९ मधील चिमुरड्या मुलींनी हे नृत्य अभिनव अश्या बॅले (नृत्यनाट्य) पद्धतीने सादर करून सर्वांचे विशेष कौतुक मिळवले. तसेच मुलांच्या गटाने यारा यारा ह्या गाण्यावर नृत्य सादर केले. ह्या नृत्यानेच कार्यक्रमाचा पूर्वार्ध संपला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाची सुरुवात कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या “लहानपण देगा देवा” ह्या एकांकी नाटिकेने झाली. पूर्वी वाड्यात एकत्र राहणारे पण आता पांगलेले काही लोक एकत्र येतात आणि पूर्वीचे फोटो बघत बघत जुन्या लहानपणीच्या आठवणींना उजळा देतात अशी नाटिकेची संकल्पना होती. सोनाली कुलकर्णी, साई अत्रे, श्रुती जाधव, अस्मिता कुलकर्णी, मयुरी पिंपळे, विशाल अत्रे आणि मयूर भागवत ह्यानी मोठ्यांच्या भूमिका केल्या तसेच, अवनी टिळेकर, शाल्मली गाडगीळ, नील दाते, वरद पोद्दार, चिन्मय कुलकर्णी, ह्यांनी भूतकाळातील लहानपणच्या भूमिका केल्या. सौ. सायली पाठक व सौ. मीरा बागुल ह्यांचे नेपथ्याने, विशेषतः त्यांनी उभेकेलेल्या वाड्याच्या चित्राने, वातावरण निर्मितीला मोठा हातभार लावला. तसेच “कथा” चित्रपटातल्या “कौन आया” ह्या नाचाच्या अभिनव वापराने सर्वांचे मनोरंजन केले. मही पत्की, इलीना पत्की, नुपुरा प्रभुणे,ज्ञानदा कुलकर्णी,हर्षिता बागुल ह्या मुलींनी बसवलेला “गौराई माझी लाडाची” हा नाच, तेसेच सौ प्रतीक्षा सोहोनीह्यांचे नृत्य दिग्दर्शन असलेला आणि धनश्री दाते, वरदा कुलकर्णी, ज्योती नारखेडे, मानसी नाईक ह्यांनी “शालू हिरवा” ह्या गाण्यावर पेश केलेल्या नाचानेही विशेष दाद मिळवली. नाटकाची संकल्पना निरंजन गाडगीळची होती तर लेखन मयूर भागवत ने केले. दिग्दर्शन मंजीरी टिळेकरचे तर नृत्य दिग्दर्शन शिल्पा रसाळचे होते. यंदा मंडळाने नेहेमीच्या पाककला स्पर्धे बरोबरच, इकेबाना स्पर्धेचेही आयोजन केले होते. इकेबाना स्पर्धेचे परीक्षक म्हणून इकेबाना कलेच्या गेली ३० वर्ष शिक्षिका असलेल्या सौ.ताकायामा ह्यांनी केले. इकेबाना स्पर्धेत सौ.स्नेहल देशपांडे विजेत्या ठरल्या. सौ.ताकायामा ह्यांनी सौ.गौरी पेंडसे ह्यांनाही विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर केले. पाककला स्पर्धेत नाविन्यपूर्ण पिझ्झा साठी शिल्पा रेठरेकर ह्यंना तर गोडपुरी साठी मुक्ता कुलकर्णी ह्यांना विजेता घोषित करण्यात आले. पाककला विजेत्यांना, श्री श्रीकांत अत्रे ह्या मंडळाच्या जुन्या सदस्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. ह्या नंतर फोर-एम फ्युजन ह्या सुजीत फडणीस, प्रमोद सोनाकुल, अजित देशमुख, अक्षय कोरडे, नेत्रा मरकळे, अनिकेत मरकळे, अमोल भिडे ह्या कलाकारांनी नृत्य, नाट्य, संगीत आणि जादू असलेला करमणुकीचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी निरंजन गाडगीळने मंडळातर्फे सर्व कलाकारांचे कौतुक तसेच आभार प्रदर्शन केले.