तोक्यो मराठी मंडळाचा संक्रांतीचा कार्यक्रम २९ जानेवारी २०११ ला उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वरभास्कर कै. पंडित भीमसेन जोशी व रंगकर्मी कै.प्रभाकर पणशीकर यांना १ मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
आपल्या प्रास्ताविकात कार्यवाही समितीचे सदस्य निरंजन गाडगीळ यांनी, २०११ सालची मंडळाची वार्षिक देणगी मानव्य या सामाजिक संस्थेला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जपान मधे कार्यरत असणाऱ्या मानव्य च्या कार्यकर्त्या सौ.अपर्णा दातार यांनी मानव्य बद्दल माहिती आणि देणगी बद्दल मंडळाचे आभार मानले. आपल्या मराठी मंडळाने जपान मधे मिळालेल्या देणग्यामधे सर्वाधिक देणगी दिली याचा अभिमान वाटतो,असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचा पूर्वार्ध मंडळाच्या सदस्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांनी रंगला. गायन, नृत्य, पोवाडा,कथाकथन अश्या वैविध्य पूर्ण कार्यक्रमांनी सर्वांची करमणूक झाली. अक्षर साठ्ये चे पेटी वादन व हिकारीगाओकाच्या कलाकारांनी सादर केलेले लावणी नृत्य विशेष दाद मिळवून गेले.
पाककला स्पर्धेमधे सौ.रुईकर यांना तिखट वडी तर स्वराली पारसनीस ला केक साठी बक्षिस जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या पुर्वार्धाचे सूत्रसंचालन सौ.रश्मी विसाळ यांनी केले.

कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगला तो "द विकेंडरस्" (THE WEEKENDERS) ने सादर केलेल्या "भावगंध" या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाने. कार्यक्रमाची नांदी नटरंग चित्रपटातल्या नटरंग उभा या गीताने झाली.
कार्यक्रमात उप्-शास्त्रीय बैठकीची "गगना गंध आला (निरंजन गाडगीळ)", "मी राधिका (गायत्री कुळकर्णी)" अशी गाणी, "तू तेव्हा तशी (संकेत देशपांडे)", "डीपाडी डिपांग (सुनीती पारसनीस, निरंजन गाडगीळ)" सारख्या उडत्या चालीची गाणी तर "बाई माझही करंगळी मोडली (सुनीती पारसनीस)" सारखी जुनी पण अविस्मरणीय अश्या गाण्यांचा समावेश होता. वाद्यांची साथसंगत राहुल पारसनीस(संवादिनी), अशुतोष देशपांडे(तबला), संकेत देशपांडे (ढोलकी), सचिन कुळकर्णी/शिवराम धरा(गिटार), मीरा गाडगीळ(घुंगरू) यांनी केली तर सूत्र संचलन आदीती पत्की हिने केले. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची क्षणचित्रे
कार्यक्रमाचे प्रायोजक: SiA SOUTH INDIAN RESTAURANT