तोक्यो मराठी मंडळ गुढीपाडवा कार्यक्रम वृतांत
तोक्यो मराठी मंडळानी पहिल्यांदाच आयोजित केलेला गुढीपाडव्याचा मेळावा आनंदी वातावरणात पार पडला. रुपश्री व प्रसाद साठे यांनी उभारलेल्या गुढीने, शिल्पा चोथवे यांच्या बहुरंगी रांगोळीने तर राहुल बापटने तयार केलेल्या मंडळाच्या १५ वर्षांच्या वाटचालीच्या क्षणचित्रांनी हॉलचे वातावरण प्रफुल्लित झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी समिती सदस्य हेमंत विसाळच्या प्रस्तावनेने झाली. मराठी नूतन वर्षाची सुरुवात सर्व सभासदांना एकत्र आणून, भेटीगाठी, गप्पागोष्टी करत आणि नवीन ओळखी वाढवत करता यावी या साठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे त्याने सांगितले.

विवीध गुणदर्शन कार्यक्रमात लहान तसेच मोठ्यांनी उत्साहाने भाग घेतला. सारा कुलकर्णी या लहानग्या बालिकेने मराठी श्लोक म्हणून, तर आरुष साठेने भगवत गीतेचा १२वा आध्याय म्हणून दाखवला. ज्ञानदा कुलकर्णी ने की-बोर्ड वादन सादर केले. शौनक बापटने रुबिक्सक्यूब काही मिनिटांच्या अवधीत सोडवून दाखवण्याचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना स्थिमित केले. यानंतर सुजीत फड्णीसची मिमिक्री, विशेषतः एस.पी बाल्सुब्र्माण्यामच्या गाण्याची हुबेहूब नक्कल, प्रेक्षकांची दाद मिळवून गेली.

त्या नंतर मिचीहीरो ओगावा यांनी मराठीमधे "माझा मराठीचा अभ्यास" ह्या विषयी थोडक्यात भाषण केले. ओगावा हे गेले काही वर्ष पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करीत आहेत. जपानी आणि मराठ्यांच्या इतिहासात बरीच साम्यही आहेत पण तितकेच फरक ही असल्या मुळे आपण मराठी इतिहासाकडे आकर्षित झालो. अर्थातच त्यासाठी मराठी भाषा शिकणे आवशक्य होते, तसेच पूर्वीची बरीचशी कागद-पत्रे मोडी लिपीत असल्या मुळे मोडी शिकेणे गरजेचे होते. सध्या ते पीएचडीच्या अंतिम अहवालाची तयारी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वानी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले तसेच मंडळातर्फे शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर धनश्री दाते यांनी रावणाने रचले असे समजले गेलेले शिवतांडव स्तोत्राचे गायन सादर केले. स्पष्टउच्चार, खडा ताल आणि सूरेल आवाज मुळे स्तोत्रगायन विशेष रंगले. त्यानंतर राहुल बापट यांनी मराठी भाषा जगभरात कशी व कुठे बोलली जाते ह्या बद्दल रोचक माहिती सांगितली. विशेषतः इस्रायेल मधे एका विशिष्ट जमातीची रोजची बोली भाषा ही मराठीच असल्याचे एक उदाहरण त्यांनी दिले. विवीध गुणदर्शन कार्यक्रमाचा शेवट ईशा विसाळने सादर केलेल्या पसायदानाने झाला. कार्यक्रमाच्या या भागाचे सुत्रसंचालन रुपश्री साठेने केले.

अल्पोपहारासाठीच्या सुट्टी नंतर “पुस्तक माझा सांगाती”ह्या कार्यक्रमा अंतर्गत अवनी टिळेकर (बोक्या सातबंडे-दिलीप प्रभावळकर), भैरवी देसाई (चिंटू- चारुहास पंडित/प्रभाकर वाडेकर), मंजिरी टिळेकर(मास्तरांची सावली-'कृष्णाबाई सुर्वे), अनुपमा देसाई (स्वतःविषयी-डॉ. अनिल अवचट), वरदा कुलकर्णी (ही श्रींची इच्छा), निरंजन गाडगीळ (युगांत-इरावती कर्वे) आणि अशोक बापट (व्यक्ति आणी वल्ली-पुलं देशपांडे) यांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकाची ओळख थोडक्यात करून दिली. पुस्तक आपल्याला का आवडले, लेखका बद्दल थोडी माहीती आणि पुस्तकातल्या विशष भावलेल्या उताऱ्याचे अभिवचन असे सादरीकरणाचे स्वरूप होते. अशोक बापट यांनी स्वतः लिहिलेल्या कवितेचे गायन सादर केले. एक वेगळाच कार्यक्रम म्हणून सर्व उपस्थितान हा कार्य्र्क्म फारच आवडला अश्या प्रतिक्रिया मिळाल्या. सूत्रसंचालन अश्विनी बापटने केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तोक्यो मराठी मंडळाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? सादर होत असल्येल्या कार्यक्रमांचा आशय, दर्जा,आयोजन इत्यादी बद्दल आपल्याला काय वाटते? या आणि अश्या इतर मुद्द्यांविषयी मुक्त चर्चा आयोजित केली गेली. उपस्थित सर्वांनीच यात सहभागीव्हावे म्हणून ५ गट पाडण्यात आले. २० मिनिटांमध्ये चर्चा करून नंतर प्रत्येक गटातर्फे एका व्यक्तींने चर्चेचा सारांश सांगायचा असे चर्चेचे स्वरूप होते. सर्व सभासदांनी चर्चे मधे उत्सुपुर्तपणे चर्चा व मत प्रदर्शन केले. कार्यकारीणी सदस्य आणि उपस्थित सदस्य यांच्या सकारात्मक चर्चेतून मराठी पुस्तकांचे वाचनालय असावे, लहान मुलांसाठी दर महिन्याला संस्कारवर्ग घेतले जावेत, गरज असेल तर वार्षिक वर्गणीही घेण्यास हरकत नाही, वर्षात कमीतकमी ४ कार्यक्रम तरी जरूर करावेत हे व असे अनेक चांगले मुद्दे पुढे आले. चर्चेचे सुत्रसंचालन करणाऱ्या निरंजन गाडगीळने, ही चर्चा ही एका प्रक्रियेची सुरुवात असून यातले जमतील तेवढे उपक्रम हाती घेऊ, पण त्यासाठी सर्वच सभासदांचे योगदान आणि सहभाग गरजेचा असेल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.