छायाचित्र: शाल्मली गाडगीळ

श्रीगणराय प्रेरित कलाप्रदर्शनातील कलाकृती

दिनांक ३० ऑगस्ट २०१४ रोजी मंडळाचा गणेशोत्सव थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजा, आरती आणि अथर्वशीर्ष पठणाने झाली. पूजेचा मान यंदा रश्मी व हेमंत विसाळ यांना मिळाला होता. रूपा व प्रसाद साठे यांनी दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षीही नयनरम्य असे मखर बनवले होते. पुजेची सांगता आरती कुलकर्णी ह्यांनी उपल्ब्ध्क केलेल्या शिऱ्याच्या प्रसादाने झाली.
पूजेनंतर सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला. स्वागत रेस्टॉरंट यांनी जेवणाची तसेच दुपारच्या अल्पोपहाराची सोय केली होती.

सहभोजना नंतर कलाकार पाहुणे आणि मराठीतील अग्रगण्य प्रवचनकार डॉ.संजय उपाध्ये यांनी आपला अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीला उतरलेला“मन करा रे प्रसन्न“हा कार्यक्रम सादर केला. काव्य-विनोद-संभाषणाद्वारे जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देणारा असा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात, आपले मन अप्रसन्न करणाऱ्या रोजच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी कोणत्या ह्याचा आढावा डॉ. उपाध्ये घेतात. रस्त्यातील बेशिस्त ट्राफिक, घरा-घरातून सांडणारा टीव्हीचा कर्कश आवाज ह्या पासून ते यशाच्या मागे धावण्याने होणारी आयुष्याची फरफट अश्या अनेक पातळीवरच्या गोष्टींचा यात समावेश आहे. कार्य्र्कमाच्या उत्तरार्धात, ह्या गोष्टी ओलांडूनही आपले मन प्रसन्न ठेवून कसे जगता येईल ह्याबद्दल आपले विचार ते मांडतात. वेगवेगळ्या प्र्स्नगांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन हा मोकळा, विसंगती ची मजा घेणारा आणि सकारात्मक ठेवल्यास कुठल्याही परिस्थितीत मन प्रसन्न ठेवणे शक्य आहे असे ते सुचवतात. आपल्याच आयुष्यातील प्रसंग निवडून डॉ.उपाध्ये त्यावर भाष्य करीत आहेत असे प्रक्षकांना वाटत रहाते आणि तिथेच ह्या कार्यक्रमाचे यश आहे. स्पष्ट, रसाळ ओघवती वाणी, कविता-विनोद ते गीतेतील श्लोक ह्यांचे उत्तम पाठांतर आणि हलका-फुलका विनोद ही डॉ.उपाध्येंच्या पेशकशीची खास अशी वैशिष्ट्ये आहेत.
कार्यक्रमा नंतर निरंजन गाडगीळने डॉ.उपाध्येंची मुलाखत घेतली तसेच प्रेक्षकांनीही काही प्रश्न विचारले. डॉ.विनीत बापट ह्यांच्या हस्ते डॉ.उपाध्येंचा स्त्त्कार करण्यात आला तसेच निरंजन गाडगीळने मंडळाच्या तर्फे त्यांचे आभार मानले.

दर वर्षी मुख्य कार्यक्रमाचा मोठ्यांना आनंद घेता यावा या साठी मंडळ लहान मुलांसाठी वेगळा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करीत असते. ह्या वर्षी मंडळाचे सदस्य श्री.अमोल भिडे यांनी ही जबाबदारी पार पाडली. जादूचे प्रयोग, चित्रकला, कराटे चे प्रत्येक्षिक अश्या विविध कार्यक्रमांद्वारे त्यांनी बालगोपाळांना गुंतवून ठेवले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रीगणराय प्रेरित कला प्रदर्शन आयोजित केले गेले. त्यात श्री.सौरभ वैद्य, सौ.प्रतीक्षा सोहोनी, कुमारी ईशा विसाळ, कुमारी शाल्मली गाडगीळ तसेच कुमारी सुरभी गाडगीळ यांनी काढलेली गणरायाची चित्र प्रदर्शित केली गेली.

कार्यक्रमाच्या शेवटी निरंजनने मंडळ लवकरच हाती घेत असलेल्या "ग्रंथ-पेटी" ह्या नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली. नाशिक-स्थित कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने हा उप्रकम हाती घेतला जाईल. नवीन-जुन्या साहित्यातील वेधक आणि वेचक अशी पुस्तकांच्या पेट्या कुसुमाग्रज प्रतिष्ठाना कडून मंडळ घेईल. सुरुवातीला २५ पुस्तकांची एक पेटी, अश्या ६ पेट्या मंडळ मागवेल. ह्या पेट्या तोक्यो च्या विविध भागात राहणाऱ्या स्वयंसेवकांकडे सोपविण्यात येतील. त्या विभागात अथवा जवळपासच्या रहिवाश्यांना ह्या पुस्तकांचा लाभ घेता येईल. ठराविक काळानंतर, पुस्तक-पेट्यांची इतर विभागांनबरोबर अदलाबदल केली जाईल. पहिले एक वर्ष हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवला जाईल अशी माहिती दिली गेली. कार्यक्रमा नंतर बऱ्याच सदस्यांनी ह्या उपक्रमात सहभागी होण्याविषयी चौकशी तसेच नाव नोंदणी ही केली.