१५ सप्टेंबर २०१३ रोजी, तोक्यो मराठी मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक आगळावेगळा कार्यक्रम साजरा केला. अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी यांनी सदर केलेली पती-पत्नीच्या नात्याचे विविध रंग उलगडणारी ‘पुनश्च हनिमून’ ही एकांकिका, आणि त्यानंतर त्यांची मुलाखत असा हा कार्यक्रम होता. विशेष म्हणजे, या एकांकिकेत, तोक्यो मराठी मंडळाच्या दोन स्थानिक कलाकारांनीही भूमिका केल्या...!

आजवरच्या तोक्यो मराठी मंडळाच्या इतिहासात, एकांकिकेचे आयोजन हा एक नवा प्रयोग असल्याने, या कार्यक्रमाला कितपत प्रतिसाद मिळेल, अशी संयोजक समितीला शंका होती. त्यात भर पडली, ती त्या दिवशी जपान ला भेट दिलेल्या चक्रीवादळाने ! चक्रीवादळ आणि पाऊस यामुळे या कार्यक्रमाची उपस्थिती कमी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशा सर्व परिस्थितीतही, या कार्यक्रमाला मंडळाच्या जवळजवळ १४० सदस्यांनी उपस्थित राहून, अतिशय मनःपूर्वक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने, तोक्यो मराठी मंडळाचे सदस्य हे खरे रसिक आहेत, याची पुन्हा एकदा प्रचीती आली!!

दुपारी ३ वाजता श्रींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निरंजन गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले, आणि त्यानंतर अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी या दोन्ही ताकदीच्या कलाकारांनी‘पुनश्च हनिमून’ ही एकांकिका सादर केली. खास जपानमध्ये सादर करण्यासाठी, त्यानी या एकांकिकेचे पुनर्लेखन केले होते. अत्यंत मोजक्या नेपथ्यात, रंगमंच व प्रकाशयोजना यांना अनेक मर्यादा असूनही, त्याची पुसटशी जाणीवही होऊ नये, इतक्या ताकदीने या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने व शब्दसामर्थ्याने रसिकांना खिळवून ठेवले. एकांकिकेतील जवळजवळ प्रत्येक वाक्याला, रसिकाची अर्थपूर्ण दाद मिळत होती. एकांकिकेत एका ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे काही क्षण अडथळा येऊनही, तो अडथळा दूर झाल्यानंतर पुन्हा जणू काहीच न घडल्यासारखी एकांकिका पूर्ववत चालू होऊ शकली, इतके रसिक एकांकिकेमध्ये तन्मय झाले होते ! या दोन्ही कसलेल्या कलाकारांबरोबरच, या एकांकिकेत तोक्यो मराठी मंडळाचे स्थानिक कलाकार प्रशांत साठये आणि राहुल बापट यांनीही भूमिका केल्या. केवळ एक दिवसाच्या तालमीवर त्यांनी जो सफाईदार अभिनय सादर केला, ते पाहून रसिक अवाक झाले! ध्वनीसंचलन मुग्धा यार्दीने तर प्रकाशयोजना निरंजन गाडगीळने सांभाळली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात या दोन्ही कलाकारांची मुग्धा यार्दीने मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या सुरुवातीला, अमृता सुभाष यांनी सदर केलेल्या जपानी भाषेतील गाण्याला, रसिकांची दिलखुलास दाद मिळाली. या मुलाखतीतून या दोन्ही कलाकारांचा माणूस आणि कलावंत अशा दोन्ही पातळ्यांवरचा प्रवास उलगडत गेला. रसिकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना या दोन्ही कलाकारांनी उत्तरे दिली. हा संवाद वेळेच्या मर्यादेमुळे थांबवावा लागला, मात्र नंतरही तो भोजनाच्या कार्यक्रमात अनौपचारिकपणे सुरूच राहिला!

रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला एक वेगळा प्रयोग, म्हणून हा कार्यक्रम रसिकाच्या सदैव स्मरणात राहील!

मोठ्या लोकांना शांतपणे कार्यक्रम बघता यावा या साठी मंडळ नेहेमीच लहानमुलांसाठी वेगळा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करते. यंदा ही जबाबदारी स्वीकारलीहोती नानामी कामता आणि त्यांच्या सहकार्यांनी. मुलांकडून आकर्षित फोटोफ्रेम तयारकरून घेऊन, त्यात प्रत्येकाने स्वतःचा फोटो लावायचा असा आगळा वेगळा उपक्रम त्यांनी आयोजित केला होता. तसेच फेसपेंटिंग, मोठ्याकागदावर मुक्त चित्र काढणे असेही मुलांच्या दृष्टीने आकर्षक असेही कार्यक्रम समावित होते. या सर्व कार्यक्रमात ३ तास कसे गेले ते लहानग्यांना कळलेही नाही. नानामी कामाता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार! कार्यक्रमाच्या शेवटी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या श्री मिलिंद रुईकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच हेमंत विसाळने मंडळाच्यावतीने आभार प्रदर्शन केले.

प्रायोजक: