सप्टेंबर २२,२०१२ रोजी तोक्यो मराठी मंडळाने जपान, तोक्यो येथे आयोजित केलेल्या दृक-श्राव्य कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अतुल परचुरे यांच्या कलेच्या प्रांतातील प्रवासाबद्दल ऐकताना, जवळजवळ ३ तास श्रोते रंगून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांच्या "मराठी वाङ्‌मयाचा गाळीव इतिहास" या पुस्तकामधील काही भागाचे अतिशय प्रभावी वाचन केले. त्यानंतर निरंजन गाडगीळ यांनी अतुल परचुरे यांची त्यांच्या कलाप्रांतातील प्रवासाबद्दल मुलाखत घेतली. अभिनयाच्या प्रांतातील वाटचालीच्या आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताना ते म्हणाले, की तरुण वयात अभिनयाइतकंच क्रिकेटचंही वेड होतं, पण अभिनयाची ओढ हळूहळू जास्त तीव्र होत गेली. अभिनयाशिवाय इतर काही करण्याचा पर्याय विचारत घ्यावासा वाटलाच नाही!
त्यानंतर त्यांना 'नातीगोती' , 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' , 'टिळक-आगरकर' अशा गाजलेल्या नाटकांमध्ये आव्हानात्मक भूमिका मिळत गेल्या. विशेषतः नातीगोती मधील मतिमंद मुलाची भूमिका प्रत्येक प्रयोगात सलग ३ तास वठवणं हे आव्हान होतं ; पण ती इतकी प्रभावी होत असे, की प्रयोगानंतर प्रेक्षकांनी आत येऊन " प्रयोगांसाठी प्रवास करताना तुम्ही त्या मतिमंद मुलाला बसमधून कसे नेता?" असे प्रश्न विचारल्याचे प्रसंगही घडले! रंगभूमीवर केलेल्या ८-१० वर्षाच्या प्रवासात, प्रयोगांमध्ये अनपेक्षित पणे घडलेले अपघात, आणि सहकलाकारांबरोबर प्रसंगावधान राखून त्यावर केलेली मात, याचे अनेक किस्से त्यांनी सांगितले.
नातीगोती सारख्या गंभीर भूमिकांप्रमाणेच, रंगभूमीवर आणि चित्रपटातही, अनेक विनोदी भूमिका त्यांनी वठवल्या. तरुण तुर्क म्हातारे अर्क मधील 'कुंदा' ची भूमिका, 'बिल्लू बार्बर' मधील शाहरुख खान बरोबर ची भूमिका, व्यक्ती आणि वल्ली तील पात्रे, R .K . Laxaman की दुनिया, अशा अनेक वैविध्यपूर्ण भूमिका त्यांना मिळत गेल्या.. यातील काही भूमिकाची झलक कार्यक्रमात दृक-श्राव्य माध्यमाद्वारे श्रोत्यांनी अनुभवली. या सबंध कार्यक्रमातून, कलाक्षेत्राच्या झगमगाटात २० हून अधिक वर्षे व्यतीत केलेला एक चतुरस्र कलाकार, आणि त्याचवेळी जमिनीवर आपले पाय रोवून असणारा , त्या झगमगाटात स्वतः ला न हरवलेला एक माणूस, असे अतुल परचुरे यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन पैलू पेक्षकांना बघायला मिळाले. दिग्दर्शन करायला आवडेल का, या प्रश्नावर ते म्हणाले, की दिग्दर्शनासाठी आवश्यक असणारी चिकाटी आपल्याकडे कमी आहे ; त्यापेक्षा, नट म्हणून नवनव्या शक्यता अजमावणं, हे आपल्याला अधिक रंजक वाटतं. शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना, सेट वर त्यांचा 'चाहता7 म्हणून नव्हे, तर 'सह-कलाकार' म्हणून वावरणं महत्वाचं; ते अंतर व्यावसायिकतेचा भाग म्हणून पाळणं आवश्यक आहे, असं त्यांनी नमूद केलं. अभिनयाच्या क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल, या श्रोत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "अभिनयाच्या क्षेत्रात आज खूप संधी, वाट निर्माण झालेल्या आहेत ; आणि अभियाच्या क्षेत्रात आजवर जी अस्थिरता, अनिश्चितता होती, तीच आज थोड्याफार फरकाने इतर क्षेत्रातही दिसते. तेंव्हा, अभिनयाच्या क्षेत्रात करियर करणं म्हणजे काहीतरी धोक्याचं असं न समजता, निश्चित उत्तेजन द्यावं."अतिशय हृद्य आणि प्रेक्षकाच्या स्मरणात राहील, असा हा कार्यक्रम झाला. तोक्यो मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाबाबत झी २४ तास ह्या वाहिनीने खालील व्हिडीओ प्रक्षेपित केली

विशेष आभार: कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक जणांचे सहकार्य लाभले.
सर्वांचेच, विशेषतः खालील व्यक्तींचे विशेष आभार:

सौ. आरती कुलकर्णी, सौ. भाग्यश्री भिडे, सौ. मनाली पाटणकर: गणपती साठी प्रसाद
श्री. केदार परांजपे, सौ.प्राजक्ता परांजपे: गणपती आरास
छायाचित्र व व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि एडीटींग: मनीष प्रभुणे