कार्यक्रमाची छायाचित्र३ सप्टेंबरला मंडळाचा १५वा गणेशोत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजा व अथर्वशीर्ष पठणाने झाली. पूजेची जबाबदारी ह्यावर्षी प्रसाद व रुपश्री साठे यांनी सांभाळली. त्यांनीच तयार केलेला देव्हारा विशेष उठून दिसत होता. स्नेहा रुईकरने गणनायकाय गणदैवताय हे गणेशवंदना सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निरंजन गाडगीळ यांनी केले.
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात, नुकतेच अपघाती निधन झालेले मंडळाचे जेष्ठ सदस्य कै.डॉ.चंद्रकांत सरदेशमुख व संगीतकार कै. श्री श्रीनिवास खळे, यां दोघांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.

या नंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला "एका संगीतकाराची मुशाफिरी" हा कार्यक्रम संगीत दिग्दर्शक श्री कौशल इनामदार यांनी सादर केला. कौशलनी त्यांच्या आजवरच्या सांगीतिक प्रवासात संगीतकार आणि गीतकार म्हणून केलेल्या कामातील निवडक रचनांची झलक पेश केली. हिंदी/मराठी चित्रपट संगीत, जिंगल्स (जाहिरातींसाठी दिलेले संगीत), जुन्या मराठी कवितांना संगीत देण्याचे प्रयोग, अशा विविध संगीतप्रकारांमध्ये त्यांनी केलेल्या कामाचा विस्तृत पट श्रोत्यांना या निमित्ताने अनुभवायला मिळाला. त्याचबरोबर, या सर्व चालींच्या जन्मकथा सांगताना, संगीत देण्याची प्रक्रिया कशी असते, त्यामागे उत्स्फूर्ततेबरोबरच किती विविध पातळ्यांवरचा खोल विचार आणि अभ्यास असतो, हेही त्यांनी अतिशय रंजकपणे विशद केले. जाहिरातींसाठी संगीत देताना त्यात संगीतकाराची प्रतिभाच नव्हे, तर ‘गणिती समज’ही कशी पणाला लागते, अशा एरवी सहज लक्षात न येणाऱ्या पैलूंची त्यांनी श्रोत्यांना ओळख करून दिली. ‘नको देवराया अंत आता पाहू’ सारख्या रुळलेल्या रचनांना वेगळ्या चाली देण्याचे त्यांनी केलेले प्रयोग, बालगंधर्व चित्रपटासाठी ‘चिन्मया सकल हृदया’ सारख्या जुन्या रचनांना नवा साज देताना त्यां नी पेललेले आव्हान आणि त्याला मिळालेली दाद, अशा अनेक ‘गाण्यांच्या गोष्टीं’ मध्ये श्रोते अडीच तास रंगून गेले होते. त्याचबरोबर, अनेक नामवंत कवींच्या रचनांना त्यांनी दिलेल्या चालींना श्रोत्यांची मनःपूर्वक दाद मिळाली. आचार्य अत्र्यांच्या झेंडूची फुले सारख्या विडंबनात्मक काव्यातील मार्मिक आणि आक्रमक विनोद असो, किंवा शब्दांत सांडले दुःख, शब्द अलुवार अशा काव्यातील हळुवार भावना, या दोन्ही गोष्टींना कौशल इनामदार यांच्यासारखा समर्थ संगीतकार सारख्याच ताकदीने कसा पेलू शकतो, याचा श्रोत्यांना प्रत्यय आला. सुमारे दोन अडीच तास रंगलेल्या या मुलाखतीत, मुग्धा यार्दी यांनी सूत्रधार म्हणून कौशल इनामदार यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा पट उलगडत नेला. श्रोत्यांच्या उत्साही प्रतिसादाने कार्यक्रम अधिकाधिक रंगत गेला, आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, श्रोत्यांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांचाही मुलाखतीत अंतर्भाव करण्यात आला. आशुतोष देशपांडे यांनी तबल्याची साथ केली.
मंडळातर्फे कौशल यांचे आभार मानत निरंजननी, मराठी मातीत आपले पाय घट्ट रोवूनही मस्तक मात्र उंच आकाशात असलेला मोठा माणूस आपल्याला भेटला अश्या शब्दात कौशल यांचा गौरव केला.
कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली.
मोठ्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी नेहेमीप्रमाणे यावर्षीही लहानमुलांसाठी वेगळे करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. श्री अमोल भिडे यांनी जादूचे प्रयोग करून तेसेच मुलांनाही जादू करायला शिकवून सर्वांना २ तास खिळवून ठेवले,