कार्यक्रमाची छायाचित्र
१८ सप्टेंबरला मंडळाचा १४वा गणेशोत्सव उत्साहाच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजा व अथर्वशीर्ष पठणाने झाली. प्रसाद व रुपश्री साठे यांनी तयार केलेले मोदकाच्या आकाराचे मखर विशेष उठून दिसत होते. गणेशपूजेची जबाबदारी मीरा व निरंजन गाडगीळ यांनी संभाळली. प्रसादाचा शिरा आरती कुलकर्णी यांनी तर मोदक मनाली पाटणकर यांनी आणले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मालविका वैद्यने केले.

मुख्य कार्यक्रमाची सुरुवात डॉ.चंद्रकांत सरदेशमुख यांच्या सत्काराने झाली. सतार वादक म्हणून ५० वर्षांची कारकिर्द पूर्ण केल्याबद्दल मंडळाच्या तर्फे हा सत्कार करण्यात आला. सत्कार श्री.दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ.सरदेशमुख यांनी, मंडळाच्या पहिल्या गणेशोत्सवात आपण सतारवादनाचा कार्यक्रम केल्याची आठवण सांगितली. ५० वर्षांची वाटचाल सोपी खचितच नव्हती, पण गुरुकृपे मुळेच हे शक्य झाले, यापुढची ५० वर्षही संगीत सेवा करीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्कार समारंभा नंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला "चिमणराव ते गांधी" हा कार्यक्रम दिलीपजींनी सादर केला. आपल्या विविध भूमिकांमागचा विचार, त्या साकारत असताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. मर्यादित साधनांच्या मदतीने काही क्षणात रुपांतर करून त्यांनी नाना पिंजे,बॉबी मॉंड, प्रा.हेरंबकर इत्यादी भूमिकासादर केल्या. चिमणराव, अलबत्या-गलबत्या मधली चेटकी, गांधी इत्यादी भूमिकांची व्हिडीओ झलकही त्यांनी दाखवली. कार्यक्रमा नंतर दिलीपजींनी प्रेक्षकांच्या प्रश्णांना उत्तरे दिली.
मंडळातर्फे डॉ.सरदेशमुख यांनी श्री प्रभावळकर यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता सहभोजनाने झाली.

मोठ्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी नेहेमीप्रमाणे यावर्षीही लहानमुलांसाठी वेगळे करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. ही जबाबदारी अश्विनी बापट हिच्या "Crazy Caterpillars"ह्या संस्थेला देण्यात आली होती, जी त्यांनी उत्कृष्ठ पार पाडली. मुलांनी तयार केलेल्या हस्तकलेचे सर्वानीच कौतुक केले.

कार्यक्रमाचे सह-प्रायोजक